हत्तरसंग कुडल
धार्मिक पर्यटन आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी श्री संगमेश्वर मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर ही दोन प्राचीन मंदिरे ; याशिवाय बहूमुखी शिवलिंग, मराठीतील आद्य शिलालेख आणि अद्वितीय स्थापत्य, शिल्प आणि मूर्ती काम यासाठी हत्तरसंग कुडल प्रसिद्ध आहे. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनासाठी पर्यटक व भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेट देतात.
श्री संगमेश्वर मंदिर हत्तरसंग कुडल
हत्तरसंग कुडल येथे भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर श्री संगमेश्वर मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर चालुक्यकालीन असून त्रिकूट किंवा तीन गाभारे असलेले मंदिर आहे. हे मंदिर चालुक्यकालीन असून पुढील काळात अनेक वेळा याचा जिर्णोद्धार झालेला आहे. मुख्य गर्भगृहामध्ये श्री संगमेश्वराची प्रतिमा असलेले भव्य शिवलिंग आहे.
मराठी भाषेतील पहिला शिलालेख-श्री संगमेश्वर मंदिरातील सभामंडपाच्या तुळईवर भारतातील मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाचे वाचन सोलापूरचे प्रसिद्ध शिलालेख तज्ञ श्री. आनंद कुंभार यांनी केले आहे. या लेखामध्ये,” जो कोणी हा लेख वाचेल तो विजयी होईल” असे सुलभ मराठी भाषेमध्ये म्हणता येईल. याच लेखांमध्ये शके 940 म्हणजे इ स.1018 असा कालखंडाचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
हरिहरेश्वर मंदिर हत्तरसंग कुडल
हत्तरसंग कुडल येथे इ. स. 1995 पूर्वी हे मंदिर मातीमध्ये गाडले गेले होते. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातील प्रा. गजानन भिडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने उत्खनन करून हरिहरेश्वर मंदिर उजेडात आणले. हे मंदिर अद्वितीय स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात शैव आणि वैष्णव पंथांचा अपूर्व संगम शिल्पकलेच्या माध्यमातून अविष्कृत करण्यात आला आहे. दोन गर्भ गृह, अंतराळ, स्वर्ग मंडप, आणि मुखमंडप अशी या मंदिराची रचना आहे.
अंतराळ -डावीकडच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग असून उजवीकडील गर्भगृहामध्ये मुरलीधर श्रीकृष्णाची प्रतिमा आहे. दोन गर्भगृहाच्या मध्ये अंतराळात श्री गणेशाची मूर्ती देव कोष्टामध्ये बसवलेली आहे. स्वर्गमंडपातील छतावर स्वर्गसुंदरी, गंधर्व, किन्नर, यक्ष, विद्याधर, भारवाहक तसेच विविध प्राणी, पक्षी यांची अप्रतिम व आकर्षक शिल्पे आहेत. स्वर्ग मंडपामध्येच शिवाची काळभैरवनाथ स्वरूपातील भव्य मूर्ती आहे.
हरिहरेश्वर मंदिरातील दुर्मिळ शिल्प
एक चेहरा व पाच शरीरे-मुख मंडपाच्या छतावर एक चेहरा व पाच शरीरे असलेले दुर्मिळ शिल्प आहे याशिवाय त्याच्या दोन्ही बाजूला छतावर श्रीकृष्ण आणि गोप तसेच श्रीकृष्ण आणि गोपिका यांचे शिल्प बसवलेले आहेत. मुखमंडपा समोर छोटे भद्र केलेले असून त्यामध्ये एकाच दगडावर एका बाजूला लक्ष्मी आणि दुसऱ्या बाजूला भैरवी यांचे अखंड शिल्प बसवलेले आहे. मुखमंडपाच्या छतावर श्रीकृष्ण कालियामर्दन करीत असलेले अप्रतिम शिल्प बसवलेले आहे.
संपर्क तपशील
पत्ता: हत्तरसंग कुडल

कसे पोहोचाल?
विमानाने
पुणे 290 किमी
रेल्वेने
सोलापूर 40 किमी
रस्त्याने
हत्तरसंग कुडल ते सोलापूर 40 किमी, पुणे ते हत्तरसंग कुडल 290 किमी